Satrane Uddane Hukar Vadani
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनिं
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी
जय देव जय देव जय श्री हनुमंता
हो स्वामी हनुमंता
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता
जय देव जय देव
दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द
थरथरल्या धरणीवर मानिला खेद
कडकडिले पर्वत उड्डुगण उच्छेद
रामीं रामदासा शक्तीचा बोध
जय देव जय देव जय श्री हनुमंता
हो स्वामी हनुमंता
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता
जय देव जय देव
कोटीच्या अधी कोटी गगनीं उडाला
अचपळ चंचल द्रोणाचळ घेउनि आला
आला गेला आला कामा बहुतांला
वानर कटका चुटका लावुनियां गेलां
जय देव जय देव जयश्री बलभीमा
हो स्वामी बलभीमा
आरती ओवाळूं सुंदर गुणसीमा
जय देव जय देव
उत्कटबळ तें तुंबळ खळबळली सेना
चळवळ करितां त्यासी तुळणा दीसेना
उदंड किर्ती तेथें मन हें बैसेना
दास म्हणे न कळे मोठा कीं साना
जय देव जय देव जयश्री बलभीमा
हो स्वामी बलभीमा
आरती ओवाळूं सुंदर गुणसीमा
जय देव जय देव