Sasa Upajala Kasa
बसा मुलांनो बसा बसा मुलांनो बसा
सांगतो कसा उपजला ससा
बसा मुलांनो बसा
आई होती एक तियेचा एक लाडका लेक
त्याने केली प्रीत आगळी जगाहुनी विपरीत
कुणा मुलीचा ध्यास लागला त्याला रात्रंदिसा
बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा
त्या मुलगीचा बोल तयाला पृथ्वीहून अनमोल
तिने इच्छिले काय मुलाने जिती चिरवी माय
आणि तियेचे काळिज आणून तिचा भरावा पसा
बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा
आई म्हणाली बाळ सखीचा शब्द आपुल्या पाळ
तुला लाभते प्रीत तियेस्तव मरेन मी निश्चित
कट्यार घे अन् चीर सुखाने उरोभाग तू कसा
बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा
काळिज असले थोर तयाला कापून घेई पोर
लेकासाठी माय सुखाने जिवंत मरुनी जाय
देवलोकी ते गेले काळिज सांडित वत्सल रसा
बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा
देव म्हणाला यास धाडणे भाग नव्या जन्मास
औक्ष राहिले अजून तरी हे आले आपणहून
ते आईचे काळिज घेऊन देवे घडला ससा
बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा
हृदयासम कोवळा सजीव हा आईचा कळवळा
आवडती या मुले गोजिरी देवाघरची फुले
स्पर्शच याचा बघा आईच्या हातासम गोडसा
बसा मुलांनो बसा सांगतो कसा उपजला ससा
सांगतो कसा उपजला ससा